उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगावात मुस्लिम समाजाची मते आली कुठून? राष्ट्रवादीच्या उज्वला पाटील यांचा सवाल
सोलापूर : अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव मध्ये मुस्लिम समाजाची मते आली कुठून त्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
उज्वला पाटील म्हणाल्या, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव मध्ये मी 2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मी सरपंच म्हणून निवडून आले. त्यावेळी गावात मुस्लिम समाजाचे एकही घर नव्हते आणि आताही नाही त्यानंतर झालेल्या 2020 मधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाची चाळीस मते आली आणि आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अचानक 150 मुस्लिम समाजाची मते वाढली ती आली कुठून? ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असताना ग्रामपंचायतीने एकही दाखला दिला नाही, मग त्यांचे आधार कार्ड कशी निघाली आणि त्यांची मतदार यादीत नावे आली कुठून याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी आणि ती नावे मतदार यादीतून नावे वगळावी अशी मागणी केली असल्याचे सांगितले.