शिवसेना नेत्यांने ग्रामपंचायतला ठोकले टाळे ;
सरपंचाच्या मनमानीविरुध्द सदस्य झाले एकत्र
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे एकरूख तरटगावच्या सरपंच यांच्या मनमानी गैरकारभार तसेच पदाचा दुरुपयोग प्रकरणी गटविकास अधिकारी यांना 13 जून रोजी निवेदनाद्वारे कारवाई ची मागणी करण्यात आली होती, त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी केवळ ‘ कागदी घोडे ‘ नाचविले. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी, 03 जुलै रोजी एकरूख ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता,मात्र सदर इशाराला गटविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले परिणामी शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल आणि ग्रामस्थानी टाळे ठोकले.
‘गाळयुक्त शिवार, गाळमुक्त धरण’ या शासन योजनेनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषतः एकरूख, तरटगांव येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकून घेतला होता. शासनाकडून त्याचं अनुदान आल्यावर एकरूख-तरटगांवचे सरपंच यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित होतं, मात्र त्यांनी आर्थिक लालचेपोटी त्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याऐवजी पैशाची मागणी सुरू केली होती.
सरपंच पैसे मिळाल्याशिवाय स्वाक्षरी करीत नसल्याची अडेलतट्टूपणाच्या भूमिकेवर कायम असल्याची गंभीर बाब पुढे आल्यावर गटविकास अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यात सरपंच यांना ‘ त्या ‘ धनादेशावर स्वाक्षऱ्या करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना स्वाक्षरीचे निर्देश देण्याबरोबरच ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार कलम 39 (1)प्रमाणे कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता, हा केवळ ‘ कागदोपत्री घोडे ‘ नाचविण्याचा प्रकार असून कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे निवेदनकर्त्यांची आग्रही मागणी होती.
गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना धनादेशावर स्वाक्षरी करुन शेतकऱ्यांची अडवणूक टाळावी, अशी सूचना दिल्यानंतरही सरपंच यांच्या भूमिका वा वर्तनात अपेक्षित बदल झाला नाही, त्यांनी आपला पदाचा दुरुपयोग करण्याचा उद्योग चालूच ठेवले असून हा मनमानी कारभार थांबावा व व गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, दिवाबत्तीची सोय व्हावी,गटारी स्वच्छ कराव्यात यासह अन्य मागण्यासाठी तात्काळ वेळोवेळी निवेदने देऊनही मागणीला दुर्लक्ष करण्यात आल्याने टाळे ठोको आंदोलनाच अल्टिमेटम देण्यात आले होते.
आंदोलन समई प्रशासनाचा कुणीही अधिकारी फिरकला नसल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत होते. अशा संकट समयी गटविकास अधिकारी केवळ कागदी घोडे नाचविण्यात दंग असल्याने मनमानी सरपंच व बिनकामी ग्रामपंचायत यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयास टाळे राहणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल यांनी माध्यमांना माहिती दिली.
पुढील दहा दिवसात कारवाई नाही झाल्यास शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकारासह पंचायत समिती याला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तालुका पोलिस ठाणे येथील कर्मचारी,दोन्ही गावचे पोलिस पाटील चोख भूमिका बजावली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नासीर जहागीरदार, कय्युम जमादार, सिकंदर जमादार, प्रभाकर भोरे, रमेश पाटील, रऊफ जमादार, अशपाक पटेल, हुजुर जमादार, बाळासाहेब होळकर, अख्तरबी पटेल, पिंटू कोलते, ईश्वर होळकर, इन्नुस जहागीरदार, हबीब पटेल, निजाम जमादार, सद्दाम मुलाणी,यासीन पटेल सह ग्रामस्थ उपस्थित होते.