“मालक काय करायचे सांगा” ! दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितले? ; भाजप प्रवेशाची चर्चा
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणातून माघार घेतल्यानंतर माजी आमदार दिलीप माने हे बरेच दिवस झाले शांत आहेत. ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना अशी चर्चा सोलापुरात होत असून ते नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याचे सुद्धा ऐकण्यास मिळू लागले आहे.
रविवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील माने समर्थक कार्यकर्त्यांनी बँकेच्या कार्यालयात मालकांची भेट घेतली. प्रत्येकानी “मालक काय करायचे सांगा, तुम्ही सांगाल ते धोरण” असा सूर यावेळी निघाला.
दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांना दोन दिवस थांबा निर्णय घेतो असे सांगून शांत केले. काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म दिला नाही त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच चिडले आहेत. यातच धर्मराज काडादी हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने माने त्यांना पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांपासून दिलीप माने हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चेने जोर धरला आहे.
दिलीप माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजप प्रवेश बाबत बोलणे टाळले परंतु माझ्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्याने मी घरी होतो, रोज कार्यकर्ते फोन करत होते, घरी येऊन चालले, त्यामुळे बँकेच्या कार्यालयात भेट घेतली. दोन दिवसात मी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.