‘कोण ठरणार जायंट किलर’ ; दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची सर्वत्र चर्चा
सोलापूर : दिग्गज राजकीय नेत्यांना धक्का देणारे जायंट किलर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा पाहायला मिळाले आहेत. सोलापूरच्या राजकारणात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना जोरदार धक्का देत त्यांचा पराभव करत जाइंट किलर ठरले.
सध्या अशीच परिस्थिती दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तयार झालेली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून शिवसेनेचे अमर पाटील, प्रहार पक्षाकडून काँग्रेसचे बंडखोर नेते बाबा मिस्त्री, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव कोगनुरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार, दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड, अपक्ष उमेदवार एडवोकेट सोमनाथ वैद्य ही नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सुभाष देशमुख वनवे जातील अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे. भाजपचे मतदान हे न फुटणारे मानले जाते. दोन टर्म आमदार असल्याने त्यांची बांधणी ही मजबूत झाली आहे परंतु त्यांना शिवसेनेचे अमर पाटील आणि अपक्ष धर्मराज काडादी, प्रहारचे बाबा मिस्त्री यांचे तगडे आव्हान आहे.
पण या सर्वांमध्ये मनसेचे महादेव कोगनुरे, दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड, वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार, अपक्ष सोमनाथ वैद्य यांनीही जोर लावला आहे. या सर्व नेत्यांच्या मतांच्या विभाजनात मी चमत्कार घडवणार आणि माझाच विजय निश्चित असे अपक्ष सांगत आहेत.
बाबा मिस्त्री हे मुस्लिम समाजाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत तसेच रुग्णसेवक म्हणून असलेली त्यांची ओळख यामुळे इतर समाजामध्ये ते लोकप्रिय आहेत. मुस्लिम सह इतर समाजाची ही मते मोठ्या प्रमाणात आपणाला मिळतील असा दावा मिस्त्री यांनी केला आहे.
शिवसेनेचा अमर पाटील यांना युवकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो. त्यांचे चुलते रविकांत पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील हे सोबत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे. लिंगायत समाजासह त्यांना मानणारा इतर समाजही असल्याने या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देऊ शकतात.
मनसेचे महादेव कोगनुरे यांनी दक्षिण विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच मागील दोन-तीन वर्षापासून मोर्चे बांधणी केली आहे. त्यांचा असलेला जनसंपर्क तसेच सागर सिमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या जोरावर ते या निवडणुकीत सर्वांचा अंदाज चुकवतील असे सांगण्यात येते.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनाही प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळतो. वंचित बहुजन आघाडी मुळे आंबेडकर समाज तसेच ओबीसी समाज यांचा जर पाठिंबा आणि मते मिळाली तर संतोष पवार हे सुद्धा या निवडणुकीत चमत्कार घडवू शकतील.
दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड यांचाही प्रचारात जोर पाहायला मिळाला. या मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी प्रचार केला आहे. शहरी भागात त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यांच्या पदयात्रा आणि रॅलीस मिळत असलेला प्रतिसाद तसेच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी ही निवडणूक लक्षवेधी केली असल्याने तसेच त्यांचा बंजारा समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे युवराज राठोड यांनी सुद्धा परिवर्तन घडवण्याचा दावा केला आहे.
धर्मराज काडादी हे एक मोठे व्यक्तिमत्व या निवडणुकीत उभे आहे. त्यांना मिळालेला सर्व समाजाचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू आहे तसेच माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, हरीश पाटील, बाळासाहेब शेळके, जाफरताज पाटील, राजशेखर शिवदारे ही नेते मंडळी त्यांच्या सोबत असल्याने आणि सिद्धेश्वर कारखान्याची पाडण्यात आलेल्या चिमणीची सहानुभूती त्यांना आहे. या निवडणुकीत जर मुस्लिम समाजाने त्यांना साथ दिली तर ते निश्चितच यावेळी जायंट किलर ठरू शकतात.