गतिमान प्रशासन अन् बरच काही ! जिल्हा परिषदेचे CEO कुलदीप जंगम यांचा असा आहे नववर्ष संकल्प
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याचा नववर्ष संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केला आहे. नववर्षा निमित्त त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यावेळी ते बोलत होते.
2024 या वर्षात तब्बल पाच ते सहा महिने हे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेले त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामाचा स्पीड वाढवता आला नाही असे सांगताना यावर्षी झेडपीचे काम गतिमान करण्याचा प्रयत्न असून शिक्षण, ग्रामपंचायत आणि आरोग्य या तीन विभागावर आपला फोकस राहील. जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या नागरिकांचे समाधान हे महत्त्वाचे आहे.
शाळेत शिक्षक, दवाखान्यात डॉक्टर आणि गावात ग्रामसेवक पूर्ण वेळ राहिल्यास जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी 90% कमी होतील असे सांगताना ते म्हणाले,
शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत आजपर्यंत सुमारे 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून यावर्षी 800 शाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शाळेत शिक्षक पूर्ण वेळ राहतात का याकडेही आपले बारीक लक्ष राहणार आहे.
आरोग्य विभागाच्या हजेरीसाठी प्रत्येक प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्रावर थंब मशीन बसविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षक, ग्रामसेवक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने ती भरती होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.