दिलदार स्वभावाचा राजा माणूस अन् कामाप्रति प्रचंड प्रेम ; संदीप कोहिनकरांनी जिंकली सोलापूरकरांची मने ; यशस्वी द्विवर्षपूर्ती

सोलापूर : अधिकारी येतात अन् जातात परंतु सोलापूरकरांची मने जिंकण्यात काही ठराविकच अधिकाऱ्यांनी यश मिळवले, त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे नाव कायमच लक्षात राहील. या मनमिळावू स्वभावाच्या राजा माणसाने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले यशस्वी दोन वर्षे पूर्ण केले आहेत. या दोन वर्षात त्यांना कामकाज करताना काही प्रशासकीय अडचणी आल्या असल्या तरी त्यांनी आपल्या स्वभावावर आणि कामाच्या जोरावर या अडचणींवर तगडी मात केल्याचे पाहायला मिळाले. दोन वर्षात दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार मिळण्याचे भाग्य याच व्यक्तिमत्त्वाला लाभले हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
2 जानेवारी 2023 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संदीप कोहिनकर यांची नियुक्ती झाली. त्यापूर्वी त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सांभाळला त्यानंतर त्यांची बदली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली तिथे कामकाज केल्यानंतर त्यांना प्रमोशन मिळाले आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले.
लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेचे कर्मचारी अशा प्रत्येकांना भेटणारा, त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेणारा अधिकारी यापेक्षा एक चांगला मित्र म्हणून कोहिनकर यांची ओळख निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षात कोहिनकर पॅटर्नची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जोरदार चर्चा ऐकण्यास मिळाली.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 24 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले असता नवखे असले तरी कोहिनकर यांनी सीईओ पदाचा पदभार अतिशय संवेदनशीलपणे सांभाळला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे बजेट करण्याची संधी त्यांना मिळाली. झेडपीचे बजेट करताना त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणल्या. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे खाजगी कामानिमित्त 21 दिवसांच्या रजेवर गेले असता मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार कोहिनकर यांच्याकडे आला. यादरम्यान ही त्यांनी चांगले कामकाज केले. प्रत्येक दिवशी केलेले काम, घेतलेले निर्णय हे जंगम यांना माहिती देताना त्यांच्याशी समन्वय साधत कामकाज केले. आपण केलेल्या कामामुळे आपल्या वरिष्ठाला कोणताही त्रास अथवा अडचण होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आमदार, माजी जिल्हा परिषद पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी, पक्षांचा कार्यकर्ता जर आला तर तो सर्वात प्रथम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चेंबरमध्ये जातो. तिथे जर समाधान झाले नाही तरच तो पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जातो. कोहिनकर यांच्यामुळे जिल्हा परिषदेमधील अनेक प्रशासकीय अडचणी दूर झाल्या आहेत.
सीईओ कुलदीप जंगम यांना प्रशासकीय कामकाज करताना कोणत्याही अडचणी, समस्या अथवा राजकीय दबाव येऊ नये याची पुरेपूर काळजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घेताना दिसून येते. जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याशी समन्वय हेच त्यांच्या कामाची जमेची बाजू म्हणावी लागेल.