सोलापूर SP अतुल कुलकर्णी यांचे “ऑल आऊट ऑपरेशन” ; या गुन्ह्यातील ३१४ आरोपी आले मिळून
सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा अतुल वि. कुलकर्णी यांनी दिनांक १५.०८.२०२४ रोजी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्येच मा. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून दिनांक २०.०८.२०२४ रोजी पहाटे ०५.०० ते सकाळी ०९.०० या वेळेत “ऑल आऊट ऑपरेशन” राबवण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या माध्यमातून आदेशीत केले होते.
सदर ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान मालाविषयी व शरीरांविषयी यापूर्वी दोन किंवा त्या पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे आरोपी, जामीनावर सुटलेले आरोपी व हिस्ट्रीशिटर्स यांना त्यांचे राहते घरी आहेत काय याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हयातील २५ पोलीस ठाणेस कळवले होते.
त्याप्रमाणे जिल्ह्यातील २५ पोलीस ठाणेकडून व स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी तपासणीसाठी विशेष पथके तयार करून ती पहाटे आरोपींच्या पत्यावर पाठवली होती. या तपासणी दरम्यान मिळून आलेल्या आरोपींची माहिती ठेवण्यात आलेली असून त्यांच्यावर पुढील काळात येणारे गणेशोत्सव, नवरात्र व विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या “ऑल आऊट ऑपरेशन” दरम्यान एकूण ३१४ आरोपी मिळून आले असून त्यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहीता क १२६,१२९, म.दा.का.क. ९३ व १४२ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली आहे. उर्वरीत आरोपींचे समुपदेशन करण्यात आले आहे. जे आरोपी मिळून आले नाहीत यांचे देखील रेकॉर्ड ठेवण्यात आले असून भविष्यकाळात गुन्हे प्रकटीकरणाच्या दृष्टीकोनातून त्याचा विचार केला जाणार आहे. या ऑल आऊट ऑपरशेन मध्ये जिल्हातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांच्यासह दोन पथकांनी सहभाग घेतला होता.