‘विमान गोव्याचं अन् मार्केट देवेंद्रचं’ इकडे मनीषराव विजय मालकांनाच विसरले !
सोलापूर : शेवटी सोलापूरच्या विमानतळावरून सोलापूरकरांना घेऊन विमान गोव्याकडे टेकऑफ झाले. हा सोहळा हजारो सोलापूरकरांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरच सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पडली आणि त्यानंतर सोलापूरला दोन वर्षात विमानसेवा ही सुरू झाली.
विमानसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाची भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची तयारी सुद्धा जोरदार दिसून आली. या कार्यक्रमात शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी लीड घेतला होता.
सोलापुरात सर्वत्र देवेंद्र फडणवीस आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्वागताचे बॅनर पाहायला मिळाले. यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचाही पुढाकार होता या सर्व बॅनर मध्ये स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे यांच्यासह जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष या सर्वांना स्थान देण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा देवेंद्र कोठे यांच्या मर्जीतीलच कार्यकर्त्यांचा वावर जास्त दिसून आला. एकूणच कार्यक्रम आणि त्याचे नियोजन पाहता आमदार देवेंद्र कोठे यांनीच मार्केट मारल्याचे पाहायला मिळाले.


काही दिवसांपूर्वी बाजार समितीची निवडणूक झाली या निवडणुकीत कोणालाही अपेक्षित नव्हते अशी ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बळीराम काका साठे यांची युती झाली आणि त्याचा फायदा बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघात सुभाष बापूंना झाला. त्यात त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख चांगल्या मतांनी निवडून आले.
अनेक दिवसानंतर सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांचे मनोमिलन झाल्याचे पाहायला मिळाले. पण सोमवारी विमानसेवा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होटगी रोडवर मनीष देशमुख यांचे सुद्धा बरेच बॅनर पाहायला मिळाले पण त्या बॅनरमध्ये विजय मालक कुठेही दिसले नाहीत त्याची कुजबुज कार्यक्रमाच्या ठिकाणी होती पण काही कार्यकर्त्यांना विचारले असता बहुतेक बाजार समितीच्या पूर्वीचे असे फिक्स डिझाईन असेल तेच गडबडीत त्यांनी लावले असे मनीष भैयांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.