जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना क्रेडिट दिलेच पाहिजे ! जे ठरवतात ते करूनच दाखवतात
सोलापूर : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सर्वसामान्य सोलापूरकरांना विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण झाले. Fly 91 चे विमान सोलापूरकरांना घेऊन आकाशात उडाले. ही विमानसेवा असेल की विमानतळाचे नूतनीकरण असेल यामागे अनेकांचे प्रयत्न आहेत. त्यात राजकीय असेल प्रशासकीय असतील किंवा सामाजिक तसेच माध्यम क्षेत्र यांच्यामुळे हे पूर्णत्वास गेले. यात सर्वाधिक श्रेय जर कुणाला जाईल तर ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना.
मागील तेवीस महिन्याच्या त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत या माणसाने एखादे काम करण्याचे मनावर घेतले तर ते त्यांनी करूनच दाखवले असे बरेच उदाहरण देता येईल. सोलापूरची विमानसेवा सुरू करणे तसे सोपे काम नव्हते. केवळ चिमणी पाडून होणार नव्हते तर त्याला प्रशासकीय पाठपुरावा सुधा महत्त्वाचा होता.
DGCA शी वारंवार संपर्कात राहून सुरुवातीला विमानतळाच्या अडचणी सोडवणे, अडथळे दूर करणे, विमानतळावर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे या प्रत्येक बाबींकडे स्वतः आशीर्वाद यांनी जातीने लक्ष घातल्याचे दिसून आले. विमानतळाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण होऊन ही विमानसेवा सुरू होत नव्हती. काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करण्यास वेळ गेला.
Fly 91 या विमान वाहतूक कंपनीला सोलापुरात आणण्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा वाटा असल्याचे भाजप आमदारांनी सांगितले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे तर श्रेय आहेच तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे शंभर टक्के प्रयत्न करतो पण प्रशासकीय सहकार्याशिवाय हे शक्य होत नाही. म्हणून त्यांचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे असे आमदार म्हणाले.