शहर उत्तर मध्ये देशमुख यांच्या ‘विजयाचा पंच’ ; मतदार संघावर मालकी कायम ; महेश कोठे यांना पराभवाचा धक्का
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे अतिशय महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते सलग चार टर्म आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांनी आपल्या विजयाचा जोरदार पंच विरोधकांवर मारला आहे. त्यांचे सर्व समाजामध्ये असलेले चांगले संबंध आणि त्यांचा मितभाषी स्वभाव हा त्यांच्या विजयाचे गणित सांगता येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांचा मात्र पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे. एकूणच वातावरण पाहता या मतदारसंघात यंदा बदल होईल अशी शक्यता वर्तवण्यात जात होती. भारतीय जनता पार्टीचे अनेक माजी नगरसेवक महेश कोठे यांना मिळाले होते. त्यामध्ये माजी नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील यांचा समावेश होता तसेच भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी सुद्धा बंडखोरी केली होती त्यामुळे मत विभाजन होऊन कोठे यांना फायदा होईल असे चिन्ह होते पण या विजयाने हे सर्व फेल ठरले.
या मतदारसंघात कोठे आणि पुरुषोत्तम बरडे यांचा वाद पाहायला मिळाला होता. कोठे यांनी बर्डे यांच्यावर थेट आरोप केल्याने शिवसेना त्यांच्यासोबत दिसली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील बिज्जू प्रधाने यांनी उघडपणे कोठे यांना पाठिंबा देताना दिसले पण त्याचा कोणताही फायदा झाला नाही. शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे यांच्यामुळे मराठा समाजाची मते विजय देशमुख यांना मिळण्यास मदत झाली. तसेच काँग्रेस पक्षाची नाराजी सुद्धा कोठेंवर दिसून आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेडकरी समाजाचे नेते आनंद चंदनशिवे यांचा निश्चितच विजयकुमार देशमुख यांना फायदा झाल्याचे पाहायला मिळते. विजय मालकांसाठी चंदनशिवे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
विजयकुमार देशमुख यांचे मुस्लिम आंबेडकरी मातंग या समाजासोबत असलेले चांगले संबंध तसेच पद्मशाली आणि लिंगायत समाजाने त्यांना पुन्हा दिलेली साथ यामुळे त्यांचा विजय सुखर झाला असे चित्र पाहायला मिळते.