उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली !
सोलापूर : अनेक दिवसांपासून उमेश पाटील ज्या प्रतीक्षेत होते त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाची माळ अखेर त्यांच्या गळ्यात पडली. कठीण संघर्षानंतर दादांनी हे पद आपल्या लाडक्या उमेशला दिले. या निवडीने अनेकांना आनंद झाला असून उमेश पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.
अजित पवार यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र स्वीकारल्यानंतर रविवारी उमेश पाटील यांच्या स्वागताची जंगी तयारी मोहोळ मध्ये करण्यात आली होती. मोहोळचे आमदार राजू खोरे यांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले.
रविवारी दुपारी उमेश पाटील यांनी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार एन्ट्री झाली. मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी त्यांचे जेसीबीने फुलांची उधळण करीत आणि क्रेनने हार घालून स्वागत केले. यानंतर मोहोळ शहरातून त्यांची रॅली काढण्यात आली.
माध्यमांशी बोलताना त्यांनी जुनी कार्यकारिणी बरखास्त करून लवकरच नव्याने कार्यकारिणी जाहीर करून युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याची भूमिका त्यांनी मांडली. पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती निवडणुकांमध्ये सार्थ ठरू असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.