मुस्लिम समाजातील 76 जोडप्यांच्या बांधल्या रेशीम गाठी ; उपक्रमाचे होत आहे कौतुक
सोलापुरातील पानगल उर्दू हायस्कूलच्या पटांगणात ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहीन फाउंडेशनच्या वतीने भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात ७६ जोडपी विवाहबद्ध झाली. हा सोहळा मुस्लिम समाजाच्या सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरला.
शाहीन फाउंडेशनच्या या विवाह सोहळ्याला खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित राहून नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी मंडळींनी गर्दी केली होती.
शाहीन फाउंडेशनचे अध्यक्ष उमर शरीफ, उपाध्यक्ष जिलानी कुरेशी आणि मिऱ्हाज हत्तुरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. सोलापूर काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्ष नजीब शेख, वाहिद विजापुरे, अय्याज शेख यांच्यासह अन्य मान्यवरांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
हा सामुदायिक विवाह सोहळा हा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झाल्यानं नवदाम्पत्यांच्या आठवणीत हा दिवस कायम स्मरणात राहिलं. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शाहीन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.