मद्रे गावात श्री गुरु सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात ; ‘ मार्ग’च्या संतोष पवार यांचा भक्तिमय सहभाग
मद्रे गावातील प्रतिष्ठित श्री गुरु सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांच्या २ दिवसीय वार्षिक यात्रेचा उत्सव मद्रे गावचे सुपुत्र आणि मार्ग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता, या यात्रेत त्यांनी विशेष उपस्थिती लावून यात्रेची शोभा द्विगुणीत केली. त्यांनी मनोभावे श्री गुरु सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले आणि पारंपरिक पद्धतीने खांद्यावर पालखी वाहत प्रदक्षिणा घातली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत त्यांनी यात्रेतील भक्तिमय वातावरणात गावकऱ्यांसह सक्रिय सहभाग घेतला. यात्रेतील महाप्रसाद वितरणाच्या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग नोंदवून भाविकांना आपुलकीने महाप्रसाद प्रदान केला.
या यात्रेची विशेषता म्हणजे संततधार पाऊस सुरू असतानाही पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या यात्रेत उत्साहाने सहभाग घेतला. धर्म, जात, पंथ या सीमा ओलांडून सर्वधर्म समभावाचा अनमोल संदेश देणारी ही यात्रा भक्तीचा एक आदर्श उदाहरण ठरली. संतोष पवार यांनी उपस्थित भाविकांना उद्देशून सांगितले की, “मनी कोणत्याही अपेक्षा न ठेवता, ईश्वराची अखंड सेवा आणि भक्ती करण्याचे महत्त्व अनमोल आहे. सर्वधर्म समभावाची भावना ही यात्रेमुळे अधिक वृद्धिंगत होते, ही परंपरा अबाधित राहण्या साठी मी समस्त गावकऱ्यांच्या शेवट पर्यंत सोबत असेल”
संतोष पवार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या अन् गोरगरीबांच्या सुख-समृद्धीसाठी आणि शांततेसाठी साकडं घातलं. यात्रेला उपस्थित राहिलेल्या प्रत्येक भाविकाला त्यांनी आपल्या विशेष शुभेच्छा दिल्या.
यात्रेच्या या दोन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात कीर्तन, भजन आणि पालखी सोहळ्याने भक्तीचा नवा आनंद मिळवून दिला. यात्रेच्या नियोजनासाठी यात्रा समिती आणि गावकऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचे पवार यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी म्हटले, “ही यात्रा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नसून, ती आपल्या संस्कृती, परंपरा आणि एकतेचे जिवंत उदाहरण आहे.”
अशा प्रकारच्या यात्रांमधून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून एकात्मतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या यात्रेच्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. याप्रसंगी मेघराज पवार (नाईक), बालू राठोड (कारभारी), ताराशिंग राठोड, सीताराम राठोड, प्रकाश पवार, पांडू पवार, संतोष राठोड, लक्ष्मण राठोड, बाबू पवार, बाळू राठोड, फुलशिंग राठोड, मेघराज राठोड, गोपू पवार, किसन पवार, सामू राठोड, हेमू राठोड व यात्रा पंच कमिटीचे सदस्य उपस्थितीत होते.