मी उमेदवार माझ्याशी भिडा, वडिलांवर काय टीका करता ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सातपुतेंवर कडाडल्या
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, जयदीप साठे, प्रल्हाद काशीद यांच्यासह कार्यकर्ते, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मागील दोन दिवसात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्या मुद्द्याला घरून प्रणिती शिंदे यांनी भाषणात भाजपवर हल्लाबोल केला.
त्या म्हणाल्या, आज या ठिकाणी प्रचंड महिला उपस्थित आहेत, कारण हा काँग्रेस राष्ट्रवादीचा मेळावा आहे, इकडे त्यांना सुरक्षित वाटते, देशातील राजमाता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांनी दिलेले जे संस्कार आहेत तेच संस्कार काँग्रेस राष्ट्रवादीने पुढे नेले आहेत आणि मी आमदार म्हणून उभी आहे. आज मी आणि सुप्रिया ताई लढत आहोत, भिडत आहोत, या संविधान विरोधी राक्षसी शक्तीच्या विरोधात, आणि आमचे दोघींचे वडील वणवण फिरत आहेत, पक्षासाठी फिरत आहेत.
माझ्या वडिलांवर का टिका करता माझ्यावर टिका करा ना, तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे, मला भिडा ना, पराभव समोर दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकली आहे तुमच्या, एवढा संघर्ष माझ्या वडीलांनी केला, त्याना बोलताना काहीच वाटत नाही.
त्या पुढे म्हणाल्या, हे आपल्या खोट्या गरीबीचा दाखला देत म्हणत फिरतात “अब राजा का बेटा राजा नही बनेगा,जो काबिल है वही बनेगा”…मग सोलापुरात केलेल्या लोक हिताच्या कामां बद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबिल आहे ते.
प्रारंभी प्रास्ताविक जयदिप साठे यानी केले. यानंतर प्रल्हाद काशिद अभिजीत पाटील यांची भाषणे झाली.