सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला
यंदाच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने चांगलीच रंगत आणि चुरस निर्माण झाली आहे. ही निवडणूक भाजप समविचारी विरुद्ध मोहिते पाटील अशीच होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा अर्ज त्यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांनी सोसायटी मतदारसंघातून दाखल केला. यापूर्वीच माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने, सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
नागरी बँका व नागरी पतसंस्था या मतदारसंघातून राज्याचे माजी सरकार मंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. माजी आमदार राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला आहे.
अजिंक्यराणा पाटील यांनी नागरी बँका व ओबीसी या दोन मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बाळराजे आणि अजिंक्यराणा यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले.
बाजार समितीचे माजी सभापती राजशेखर शिवदारे यांच्या पत्नी भारती राजशेखर शिवदारे यांनी दक्षिण तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केला.
आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.
दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांनी तब्बल चार मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी सोसायटी, नागरी बँका, कृषी पणन व दुग्धविकास संस्था अशा चार मतदारसंघाचा समावेश आहे.
भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार यांनी नागरी बँका शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी नागरी बँका या मतदार संघातून अर्ज दाखल केले आहेत. माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सिद्धाराम म्हेत्रे यांनी नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग या मतदारसंघातून अर्ज भरला असून त्यांचे पुतणे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी अर्ज दाखल केला.
शिवसेनेच्या उपनेते अस्मिता गायकवाड व भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी महिला आणि नागरी बँका या दोन मतदारसंघातून अर्ज भरला आहे. बंजारा समाजाचे कार्यकर्ते युवराज राठोड यांनी भटक्या विमुक्त जाती जमाती या मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला.
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप व त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.















