सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंदे, नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले डान्सबार तसेच सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गणेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने दिनांक ०६ सप्टेबर २०२६ रोजी रात्री ००. १५ वा. सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भोगाव, ता. उत्तर सोलापूर येथील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’ येथे छापा कारवाई केली.
सदर ठिकाणी महिला अंगावर तोकडे कपडे परिधान करून विभत्सपणे अश्लील हावभाव करीत हिंदी व मराठी गाण्यांच्या तालावर नृत्य करीत असल्याचे तसेच ग्राहकांकडून महिलांच्या अंगावर नोटा उधळल्या जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच सदर ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे व संबंधित कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या १५ महिला व ग्राहकांची चौकशी करून त्यांची नावे पत्ते निष्पन्न करण्यात आले असून, घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व इतर साहित्य असा एकूण २८,२५,०१० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी संबंधित चालक, मालक, व्यवस्थापक तसेच अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६,२२३,३ (५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३/१३१ तसेच महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष, बाररूम यामधील नृत्य व अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम मधील संबंधित कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे















