दिलीप मानेंच्या निवासस्थानी पालकमंत्र्यांनी चाखली टेस्टी आमरसाची चव ; या नेत्यांच्या उपस्थितीने वाढला गोडवा
सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार, काँग्रेस नेते दिलीप माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. स्वतः दिलीप माने यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्यांचे आदिरातिथ्य केले. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीने राजकीय गोडवा वाढल्याचे पाहायला मिळाले. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
दिलीप माने आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा जुना याराना आहे. पालकमंत्री सोलापूरला आले की आवर्जून दिलीप माने हे त्यांची भेट घेतात, दिलीप माने यांच्या चिरंजीव पृथ्वीराज माने यांच्या विवाह सोहळ्याला सुद्धा जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली होती.
गुरुवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर शहरात भरगच्च कार्यक्रम होते त्यापैकी दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील सुमित्रा या निवासस्थानी दुपारच्या सुमारास त्यांची सदिच्छा भेट आणि स्नेहभोजन असा कार्यक्रम होता.
दिलीप माने यांनी त्यांच्या स्वागतासाठी भव्य शामियाना उभा केला होता. यावेळी आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष उज्वला पाटील, अशोक देवकते यांच्यासह दिलीप माने यांचे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी निवासस्थानी झाली होती.
पालकमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर दिलीप माने यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर या ठिकाणी स्नेहभोजनाचा आस्वाद पालकमंत्री त्यांनी घेतला. त्याचवेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे ते सुद्धा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी दाखल झाले त्यांनाही सोबत घेऊन सर्व नेते जेवायला बसले.
यावेळी माने यांच्या निवासस्थानी झालेल्या स्नेहभोजनाच्या मेनूमध्ये आमरसाने लक्ष वेधले. या आमरसावर सर्वच नेत्यांनी ताव मारला. या आमरसामुळे सर्वपक्षीय गोडवा पाहायला मिळाला. जेवणानंतर पत्रकारांनी आमदार सोपल यांना आमरस गोड होते का असे विचारले असता आमरस हे गोडच असते परंतु ते अधिकच टेस्टी होते, देवगड हापूसचे होते ना असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
बाजार समितीची निवडणूक लागल्याने त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वी तीन टर्म बाजार समितीवर दिलीप माने यांची वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सचिन कल्याणशेट्टी यांनी लक्ष घातल्याने दिलीप माने यांची भूमिका काय राहणार याची उत्सुकता असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने ही भेट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.