हसापूरेंच्या उपस्थितीत महादेव कोगनुरे यांची दक्षिणमध्ये उमेदवारीची मागणी

सोलापूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनुरे यांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करत येऊन सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला.
महादेव कोगणूरे हे उमेदवारी मागण्याचा अर्ज दाखल करणार असल्याने सकाळपासूनच काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांची गरज झाली होती. रिक्षावर भोंगा लावून गाणी वाजवण्यात आली. कार्यकर्ते गळ्यामध्ये काँग्रेसचा शेला बांधून हजर होते.काँग्रेस भवन समोर असलेल्या गुरू भेट इथल्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन त्यांचे भवनात आगमन झाले.
उमेदवारी मागणी अर्ज देतेवेळी जिल्हा संघटक रमेश हसापुरे, दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील, आहेरवाडीचे प्रभाकर दिंडोरे, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते यांच्यासह कोगनुरे समर्थक एम के फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी महादेव कोगनुरे यांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यापूर्वी सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाते. जळीत कुटुंबासाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून महादेव कोगनुरे यांची ओळख निर्माण झाली आहे.