सोलापूर : सोलापुरातील भारतीय जनता पार्टीमध्ये दोन आमदार देशमुखांमधील अंतर्गत वादाचा फटका आता पक्षाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी भाजपचे ‘कमळ’ सोडून आता काँग्रेसचा हातात ‘हात’ घेण्याची तयारी दर्शवल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
दरम्यान प्रवेशाच्या पूर्वसंध्येला त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे काही नेते त्यांच्या निवासस्थानी बसून असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राध्यापक अशोक निम्बर्गी भारतीय जनता पार्टी मधील जुना व एक अभ्यासू नेता म्हणून ओळख. त्यांनी यापूर्वी महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची जबाबदारी आक्रमकपणे निभावली. त्यानंतर ते पक्षाचे शहराध्यक्ष होते. पूर्वी ते माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक मानले जायचे. नंतर देशमुख यांच्याशी बिनसल्याने आमदार सुभाष देशमुख हे राज्याचे सहकार मंत्री झाले त्यानंतर निंबर्गी हे त्यांच्या गटात सामील झाले.
तेव्हापासून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील गट म्हणून अशोक निंबर्गी त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांकडे पाहिले जायचे. विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर ही या नेत्यांनी बराच वेळा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. शेवटी निंबर्गी यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आता समोर आली आहे.
रविवारी सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचा मेळावा होत आहे त्या मेळाव्यात निम्बर्गी हे काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान निंबर्गी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय. भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती घेतली असता समजले की, निंबर्गी यांनी भाजप सोडून जाऊ नये यासाठी माजी सभागृह नेते सुरेश पाटील, हेमंत पिंगळे यासह काही कार्यकर्त्यांनी सरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समजले.




















