हगलूरच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी 44 लाखांचा निधी; दिलीप माने यांच्या हस्ते भूमिपूजन
उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलुर येथे मंगळवारी माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच यावेळी गावात बसवण्यात आलेल्या पाण्याच्या आर ओ प्लॅन्टचेही उद्घाटन माने यांच्या हस्ते पार पडले. त्यामुळे हगलूर ग्रामस्थांच्या आरोग्यसंबधीच्या सुविधामध्ये भर पडली आहे.
हगलूर आणि परिसरातील गावामध्ये एका प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची आवश्यकता होती. त्यानुसार माजी आमदार दिलीप माने आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या कामास मंजुरी मिळाली आहे. यासाठी 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतून या उपकेंद्राला 44 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मंगळवारी त्याकामाचा दिलीप माने यांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. तसेच, यावेळी हगलूर ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आर ओ प्लांट बसवण्यात आला आहे. त्या प्लांटचे उद्घाटन देखील माने यांच्या हस्ते करण्यात आले.
माने म्हणाले, ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज या सोबतच चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच सरकारी आरोग्य सेवक आपली सेवा देत असताना उपचारासाठी सुसज्ज अशा इमारतीची देखील आवशकता आहे. हगलूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे हगलूरसह हिप्परगा, एकरूख तरटगाव या चार गावातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सरकारी आरोग्य सुविधेचा लाभ होणार आहे. तसेच पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते मात्र आता आरओ प्लांटमुळे नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देखील आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत होणार असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले.
माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रयत्नातूनच हगलूर गावासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे. तसेच या उपकेंद्रासाठी इमारतीला निधी देखील तात्काळ मंजूर झाला आहे. माने यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात, अशा भावना माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी सभापती रजनी भडकुंबे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, माजी जि. प. सदस्या मिनाक्षी भडकुंबे, सरपंच संगीता बेळके, उपसरपंच प्रगती भडकुंबे, श्रीरंग मगर यांच्यासह शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख राजू शिंदे, शाम शिंदे, दत्तात्रय शिंदे, अंगद चव्हाण, शिवशंकर शिंदे, माणिकराव नरवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.