सोलापूर : सोलापुरात आज सोमवारी सायंकाळी आठ नंतर सर्वच पेट्रोल पंपावर प्रचंड अशा रांगा दिसून आल्या. अनेकांना वाटले नेमके काय झाले परंतु सोलापुरात अशी अफवा पसरली की आता पेट्रोल पंप बेमुदत बंद राहणार. त्यामुळे प्रत्येक जण खिशामध्ये आहे तेवढा पैसा टाकून पेट्रोल भरू लागला. म्हणूनच या रांगा पाहायला मिळाल्या.
दरम्यान याबाबत सोलापुरातील पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पेट्रोल पंपांवर जितका साठा आहे तो संपेपर्यंत पेट्रोल मिळेल. मंगळवारी सुद्धा सोलापूर शहरातील सर्व पेट्रोल पंप चालू राहतील. हा संप पेट्रोल पंप चालकांचा नसून पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकर ट्रक चालकांचा आहे. हा संप देशव्यापी असून तो मंगळवारी मिटेल अशी अपेक्षा या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सोलापूर शहरातील काही पंपांवर नागरिकांनी गोंधळ घातला त्यामुळे नाईलाजात्सव पंप चालकांना पंप बंद करावे लागले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना सोलापूर शहरातील पेट्रोल पंप धारकांना तात्काळ बंदोबस्त पुरवण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगितले.
एकूणच सोलापूर शहरातील पंप बंद राहणार अशा अफवा पसरल्याने हा गोंधळ उडाला आहे. मंगळवारी सोलापूर शहरातील पंपांवर पेट्रोल डिझेल मिळणार आहे. ज्याच्याकडे स्टॉक संपेल तोच पंप बंद राहील अशी माहिती मिळाली.