सीईओ मनीषा आव्हाळे यांचा दणका ; त्या कर्मचाऱ्याला स्वतःचा ‘प्रताप’ भोवला ; तडकाफडकी बदली
सोलापूर : प्राथमिक शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून एकाच टेबलला चिटकून बसलेले सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रताप रुपनर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तडकाफडकी बदली केल्याचे समजते. रुपनर यांना महिला व बालकल्याण विभागात पाठवण्यात आले असून त्यांच्या जागेवर महिला बालकल्याण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शिक्षण विभागातील अधीक्षक पदाचा पदभार रुपनर यांच्याकडे होता त्यांच्या बऱ्याच तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.
जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्रप्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती परंतु मागील दोन महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले होते.
प्रहार संघटनेने हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या दिव्यांग महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहून आव्हाळे या सुद्धा भावूक झाल्या. तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याचा सूचना केल्या.
प्रहारचे जमीर शेख यांनीही रुपनर यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान नोटीस देऊनही खुलासा न आल्याने सीईओ आव्हाळे यांनी तडका फडके रुपनर यांना शिक्षण विभागातून हटवून थेट महिला बालकल्याण विभागात बदली केली असल्याची माहिती समोर आली आहे.