जिल्हाधिकारी यांच्या शासकीय बंगल्यातील भोजनाने अनाथ बालके तृप्त ..! आदर्श उपक्रम
सोलापूर – छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनाथ मुला- मुलींना घरी बसविलेल्या गणरायाचे दर्शन घडवित ऐतिहासिक असलेल्या प्रशस्त शासकीय निवासस्थानात बालकांसमवेत भोजन घेत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात यांनी त्याच्या निवासस्थानी जय किशन शिक्षण संस्था संचलित भगवान बाबा बालिकाश्रम व योगेश्वरी बालकाश्रम येथील बालकांना महाआरती व महाप्रसादासाठी बोलावले होते. अनाथ मुलांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने छत्रपती संभाजीनगर च्या जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवासस्थान दुमदुमून गेले. अनाथ मुलांनी आनंदाने गणरायाची आरती केली.
दरम्यान, दुपारी ही मुले जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान नक्की असते तरी कसे याबद्दल मनात प्रचंड कुतूहल बाळगत जिल्हाधिकारी यांचे निवासस्थानी आली होती…!
या श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने या मुलांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन केले होते. यात ही मुले अंगात लाल व भगव्या रंगाचे सदरे घालून मोठया शिस्तीने टेबल खुर्चीवर येऊन बसली. त्यांच्यासाठी आज पंचपक्वांनांचा थाट होता. या भिरभिरत्या नजरेच्या मुलांनी जेवायला सुरूवात केली. जिल्हाधिकारी यांनी पुढे सरसावत मुलांना जेऊ घातले. स्वतःच एकेक पदार्थ घेऊन मायेने त्यांना आग्रह करून वाढू लागले. जिल्हाधिकारी व त्यांच्या पत्नी करूणा स्वामी यांनी मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. या ठिकाणी उपस्थित प्रशिक्षणार्थी आयएएस यांनी देखील मुलांसमवेत महा प्रसाद घेतला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वत मुला मुलींना हाताने भरविले. गरम गरम चपाती, बेसन गोळ्याची आमटी, पुलाव, गुलाबजामून, तवा पनीर ची भाजी, कचोरी, पाणी पुरी असा खास बेत या अनाथ बालकांसाठी केला होता. जिल्हाधिकारी यांचे सुविद्या पत्नी करूणा स्वामी यांनी सर्व मुलांना मायेने भोजन देऊन आदरातिथ्य केले. सोलापूर हून म्हाडाचे वित्त विभागाचे उपसंचालक अजयसिंह पवार, सोलापूर उद्योजक प्रल्हाद काशिद, नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी उपस्थित होते. समन्वयक म्हणून जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक दिपक मोरे यांनी नेटके नियोजन केले होते. संस्थेतील बालकासोबत कर्मचारी व संचालिक कविता वाघ-घुगे, व्यवस्थापक नितीन घुगे, अधीक्षिका योगीता बाविस्कर, बाल कल्याण अधिकारी विजय मगरे उपस्थित होते.