महिला तलाठी व महसूल सहाय्यक सतरा हजाराची लाच घेताना सापडले ; याठिकाणी झाली कारवाई
शेत जमिनीवर मुलांची नावे लावण्या कामी प्रस्ताव तयार करून बार्शी तहसील कार्यालयाला पाठवण्यासाठी 17 हजाराची लाच घेणाऱ्या महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्या तलाठ्यास लाच घेण्यात प्रोत्साहन देणाऱ्या महसूल सहाय्यकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
श्रीमती ऐश्वर्या धनाजी, शिरामे, पद तलाठी, (वर्ग- ३), नेमणूक सज्जा ताड सौंदणे, तहसिल कार्यालय बार्शी अंतर्गत रा. अंबीका गृहनिर्माण सोसायटी, परांडा रोड, बारंगुळे प्लॉट, बार्शी व रविंद्र आगतराव भड, पद महसूल सहाय्यक, (वर्ग- ३), नेमणूक तहसिल कार्यालय बार्शी रा. अरिहंत बोपलकर हॉस्पीटल समोर, देवकर प्लॉट बार्शी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे नावे आलेल्या शेत जमीनीचा महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप पत्र होवून त्यांचे मुलाचे नावे होणे करीता तलाठी कार्यालय ताड सौंदणे यांचेकडे दि. ०५/०२/२०२५ रोजी अर्ज सादर केला होता.
सदर अर्जाचे अनुषंगाने यातील तक्रारदार पाठपुरावा करत असताना यातील लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिराने पद तलाठी यांनी सादर केलेल्या अर्जावरुन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये प्रस्ताव तयार करुन तो तहसिलदार बार्शी यांचेकडून मंजुर करून त्याबाबतचे आदेश काढणे करीता स्वतः करीता तसेच इतरांकरीता असे म्हणून १७,००० रुपये लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारली आहे. तसेच यातील लोकसेवक रविंद्र भड, पद महसूल सहाय्यक, तहसिल कार्यालय बार्शी यांनी श्रीमती ऎश्वर्या शिरामे यांचे लाच मागणीस संमती तसेच प्रोत्साहन देवून बेकायदेशीर वर्तन केले आहे म्हणून यातील लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिरामे, पद तलाठी रविंद्र भड, पद महसूल सहाय्यक यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.