तत्कालिन ग्रामसेवक दफ्तर देईना ! वैतागलेल्या सरपंचाची झेडपीत धाव
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी इथल्या एनटीपीसी प्रकल्पाकडून फताटेवाडी ग्रामपंचायतला मिळणाऱ्या करामध्ये सात कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा विषय गाजत आहे. या प्रकरणात सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणाची दोन वेळा समितीकडून चौकशी होऊन समितीकडून क्लीन चीट मिळाली आहे परंतु तत्कालीन निलंबित ग्रामसेवक दप्तर देण्यास तयार नाही. त्यामुळे अडचणीत आलेल्या सरपंचाने जिल्हा परिषदेत धाव घेऊन त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी म्हटले आहे की, सरपंच म्हणून मी स्वतः सध्या कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि चौकशी समिती मार्फत वारंवार दप्तराची मागणी करूनही तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी बालाजी दिनकर पाटील यांनी ग्रामपंचायत फताटेवाडी येथील दप्तर देण्यास टाळाटाळ केलेली आहे व करत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे पुढील नियमित कामकाज करणेस अडचणी येत आहेत.
त्यामुळे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी बालाजी दिनकर पाटील यांचेवर आपल्या स्तरावरून नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांचेकडे असलेले ग्रामपंचायत फताटेवाडी येथील दप्तर ताब्यात घेणेस विनंती आहे. दरम्यान माध्यमांना राठोड यांनी ही माहिती दिली.