तर वाट बदलावी लागेल…! सोलापुरात शिंदे सेना सोडताना कार्यकर्त्याची खदखद आली समोर
सोलापूर : पक्षातील गटबाजी, दलाली वृत्ती, कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष याला वैतागलेल्या एका शिवसैनिकाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कायमचा राम राम ठोकला आहे. पक्ष सोडताना या कार्यकर्त्याने एखाद्या गोष्टीची वाट बघताना जर आपलेच वाट लागणार असेल तर वाट बदलावी लागेल असे म्हणून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
शिवसैनिक नवनाथ हरी भजनावळे यांनी शिंदे गटाचे सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या नावाने पत्र लिहून शिवसेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. या पत्रामध्ये त्यांनी पक्षात होत असलेली कुचंबना, वरिष्ठांचे दुर्लक्ष, कामकाज करताना मिळत नसलेले सहकार्य यावर परखडपणे भाष्य करत सोलापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाली उरला नाही त्यामुळे आम्ही जायचे कुणाकडे असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेला राम राम ठोकला आहे.