फारूक शाब्दी यांच्या रोजा इफ्तार मधून एमआयएम गायब ; भाई कुछ समझ मे नही आया
सोलापूर : एमआयएम या पक्षाकडून सोलापूर शहर मध्ये या विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा उमेदवारी मिळालेले प्रदेशचे कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या रोजा इफ्तार पार्टी मधून पक्ष आणि पक्षाचे नेते गायब झाले आहेत. यापूर्वी शहरात शाब्दी यांनी घेतलेल्या प्रत्येक रोजा इफ्तार पार्टीच्या बॅनरवर पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी, माजी खासदार जलील, पक्षाचे चिन्ह पतंग हे फोटो पाहिला मिळायचे परंतु यंदा तसे काहीही न दिसल्याने हा एकच विषय या रोजा इफ्तार पार्टीमध्ये चर्चेचा ठरल्याचे ऐकण्यास मिळाले.
2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी फारूक शाब्दि यांनी एमआयएम मध्ये प्रवेश करून पहिल्यांदा पक्षाचे तिकीट आणून मध्य मधून निवडणूक लढवली. त्यावेळी ते दुसऱ्या नंबर वर राहिले. शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने ‘ताई नंतर भाई’ असे वातावरण तयार झाले. त्यामुळे ते आमदार होतील असेही बोलले गेले परंतु भाजपच्या देवेंद्र कोठे यांनी बाजी मारून सुमारे 50 हजाराच्या फरकाने फारूक शाब्दी यांचा पराभव केला.
या पराभवानंतर शाब्दि हे प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले परंतु कार्यकर्ते आणि जनतेला त्यांनी मला महापालिकेमध्ये साथ द्या, मला नाराज करू नका असे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले.
यावेळेस पानगल प्रशालेच्या मोठ्या मैदानावर रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रिकेमध्ये सुद्धा एमआयएमचा कुठेही नामोल्लेख नव्हता तसेच रोजा इफ्तारच्या प्रत्येक बॅनरवर केवळ फारूक शाब्दि यांचा फोटो आणि नाव पाहायला मिळाले. यामुळे शाब्दि हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शाब्दी यांचे सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेले चांगले संबंध पाहता ते काँग्रेसमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु तसे अधिकृतरित्या अजूनही एमआयएमच्या सूत्राकडून समजले नाही.
एकूणच इफ्तार पार्टी मधील वातावरण पाहता एमआयएम पक्षापासून शाब्दि हे नक्की लांब चालले असल्याचे स्पष्ट बोलले जात आहे.
फारूक शाब्दि हे जरी मोठे उद्योजक, व्यावसायिक असले तरी त्यांची जी युवकांमध्ये सोलापुरात क्रेझ आहे ती केवळ एमआयएम या पक्षामुळे असल्याचे यापूर्वीच्या काही नेत्यांच्या प्रतिष्ठे वरून पाहायला मिळते.