सोलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या जनताविरोधी धोरणांमुळे कामगार हा रसातळाला जात आहे. अशा कामगारांना कायद्याचे संरक्षण कवच काढून घेण्याचे पाप सरकरने केले आहे. दिवसेंदिवस आहे रे आणि नाहीरे वर्गाची दरी वाढत असून गरिबीने उच्चांक गाठलेले आहे. देशात भांडवलदार आणि जमीनदार यांना सरकारचे अभय आहे. म्हणून त्यांना मातीत गाडून, फेकून देऊ गरीबचं ओझं आणू कष्टकऱ्यांच राज! हा निर्धार या १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनी आपण केला पाहिजे असे आवाहन आपल्या अभिभाषणात ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.
१ मे रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन व सोलापूर महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण व अभिभाषण समारंभ पार पडला. संपूर्ण परिसरात लाल रंगाचे फरारे, सुबक रांगोळी, फुलांची सजावट, लाल रंगाचे वस्त्र परिधान करून शहीद शूरवीरांनी दिलेला क्रांतीचा लाल झेंडा ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजा नाट्य मंडळ कला पथकाच्या वतीने क्रांती गीते सादर करून कार्यकर्त्यांमध्ये स्फुलिंग चेतावले. तसेच यावेळी पक्षाचा लढाऊ कार्यकर्ता कॉ. शकील आगवाले यांचे नुकतेच आकस्मित निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवारावर संकटाची कुऱ्हाड कोसळली. त्यांच्या परिवाराला सिटू कडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी सिटूचे महासचिव कॉ. एम.एच.शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले कि, कामगारांच्या नोकऱ्या, वेतन, कामाची परिस्थिती आणि मोठ्या कष्टाने लढून मिळवलेले अधिकार, लाभ आणि मूलभूत हक्क यांच्यावर सत्ताधारी वर्गाच्या होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात, सर्व प्रकारचा त्रास, दडपशाही व शारीरिक हल्ल्यांसारख्या अमानुष हल्ल्यांना तोंड देऊन शूरपणे लढणाऱ्या जगातील कामगार, कष्टकऱ्यांना भातृभावी अभिवादन करीत आहे. जगभरात जवळ जवळ सर्व खंडांमधील अनेक देशांमध्ये कामगारांच्या सर्व विभागांना व्यापून टाकणाऱ्या कामगारांच्या लढ्यांच्या लाटा उसळलेल्या पहायला मिळत आहेत. अशावेळी कामगारांची एकजूट काळाची गरज आहे. म्हणून जागातील कामगारानो एक व्हा हा संदेश पुढे घेऊन जाऊ या असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी,नसीमा शेख,कॉ.नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, दीपक निकंबे, कुरमय्या म्हेत्रे,कामिनी आडम,म.हनिफ सातखेड,प्रा.अब्राहम कुमार,शेवंता देशमुख,सुनंदा बल्ला, मुरलीधर सुंचू,सलीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, दत्ता चव्हाण, अँड.अनिल वासम,बाळकृष्ण मल्ल्याळ, सनी शेट्टी,शकुंतला पाणीभाते, बाबू कोकणे,विरेंद्र पद्मा, अशोक बल्ला, लिंगव्वा सोलापूरे,दाऊद शेख, नरेश दुगाणे, अकील शेख,विजय हरसुरे, आरिफ शेख, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण,अफसना बेग, अमित मंचले, शाम आडम आदींसह यावेळी सिटूचे राज्य व जिल्हा पदाधिकारी व समिती सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.




















