सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या काय चाललंय हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. माजी शहराध्यक्ष अशोक निम्बर्गी यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर भाजपातील काही नाराज ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे जुने आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी कार्यकर्ते व मित्र परिवारांचा स्नेह मेळावा घेऊन,पक्षात होत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे पक्षात राहायचे की नाही? यावर चर्चा केली होती.
दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष नरोटे आणि अशोक निम्बर्गी तसेच राष्ट्रवादीचे किसन जाधव यासह बिजू प्रधाने यांनीही सुरेश पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले. सुरेश पाटील यांचीच चर्चा मंगळवार आणि आज बुधवारी दिवशभर प्रसार माध्यम व नागरिकांमध्ये होती, सुरेश पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सुरेश पाटलांच्या प्रसार माध्यमातील बातम्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत गेल्या त्याचबरोबर सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी ही त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर अक्कलकोट दौरा संपवून पुण्याकडे निघत असताना, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी सुरेश पाटलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व त्यांना आपण पार्टी सोडण्याचा विचार देखील मनात आणायचा नाही म्हणत, पार्टी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असून आपणास काही अडचण असल्यास आपण थेट स्वतः मला किंवा आमदार सुभाष देशमुख किंवा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी चर्चा करा व मी सोलापूर दौऱ्यावर येणार असून मी आपल्या व प्रा.अशोक निंबर्गी यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा करणार असल्याचे बोलताना सांगितले.
सुरेश पाटलांशी बोलताना ते हे देखील म्हणाले की, आपल्या पार्टीत जुन्या लोकांवर मी अजिबात अन्याय होऊ देणार नाही, इतर पक्षात जायचा विचार देखील आपण डोक्यात आणू नका अशी विनंती बावनकुळे यांनी केल्याचे समजते.
यावेळी चर्चा करताना सुरेश पाटलांनी देखील त्यांना गेल्या 7 ते 8 वर्षात पक्षात होत असलेल्या त्रासाबाबत व त्यांना मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत सविस्तर माहिती देत, आपली भेट होई पर्यंत मी इतर पक्षात प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय घेणारं नसल्याचे वचन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी दूरध्वनी वरून संपर्क करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक नेत्यांनी कोणताही संपर्क केला नसल्याचे सुरेश पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.



















