सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 ते 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आठ मे शनिवार रात्री आठ वाजल्या पासून ते 15 मे सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध असणार आहेत जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सुरू असलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवा देखील 8 ते 15 पर्यंत बंद असतील. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहतील अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. 8 मे रात्री 8 ते 15 मे सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
शहर व जिल्ह्यात काय सुरु, काय बंद राहणार
किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेता आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने देखील या आठवडाभरासाठी संपूर्णपणे बंद असतील. मात्र नागरिकांना अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सवलतीसाठी उद्या 7 मे शुक्रवार आणि 8 मे, शनिवारी सकाळी 7 वा सकाळी 11 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
प्रशासनाने घोषित केलेल्या आदेशानुसार केवळ हॉस्पिटल, मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडित अस्थापनाच या काळात सुरू राहणार आहेत. शेतीशी संबंधित सर्व अस्थापना सुरू राहणार आहेत रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मटन मासे चिकन विक्री संदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे चित्र आहे हॉटेलमधील पार्सल सेवा आहे तशा चालू राहतील दरम्यान ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील हेच आदेश लागू राहतील अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
दूध विक्री केवळ घरपोच करता येईल. तसेच लसीकरणसाठी जे नागरिक घराबाहेर पडतील त्यांच्याकडे नोंदणीचे मेसेज असणे गरजेचे असणार आहे. नोंदणी केलेल्या दिवशीच आणि त्याच वेळेत लसीकरणसाठी घराबाहेर पडता येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. तसेच मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत असलेल्यांनी आपल्या सोबत ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल अशी माहिती देखील तेजस्वी सातपुते यांनी दिली.
सोलापुरातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने पाच हजार लोकसंख्येच्या गावात कोविड केअर सेंटर केल्यामुळे त्या भागातील कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांची तिथेच सोय होणार आहे कमी लक्षणे असलेल्यांना याठिकाणी ऍडमिट करण्यात येणार आहे पूर्वी लक्षणे असूनही कोरोना टेस्ट केली जात होती मात्र आता कोविड सेंटर सुरू झाल्याने नागरिक स्वतःहून टेस्ट करत आहेत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आता जिल्ह्यातील 25 प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी दहा ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.


















