इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याचे नियोजन आहे मात्र याला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे एकीकडे पालकमंत्री सोलापूरला असलेले नियोजित एक थेंबही पाणी इंदापूरला घेणार नाही असे सांगत आहेत दुसरीकडे मात्र दिवसेंदिवस पालकमंत्री यांच्यावरील रोष वाढत चाललेला आहे याच पार्श्वभूमीवर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील माढा तालुक्यातील शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारल्यास निश्चित यश मिळेल असे सांगतानाच रविवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नेते आमदार खासदार जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेणार असल्याची माहिती दिली होती .
रविवारी झालेल्या बैठकीला भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार-खासदार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष उपस्थित नव्हता , काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते दिसले नाहीत, या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी स्वीकारले, यावेळी माजी आमदार नारायण पाटील, संजय कोकाटे, अजिंक्यराणा पाटील, सोमेश शिरसागर, जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे ,माजी सभापती संजय पाटील, बंडु नाना ढवळे, कैलास तोडकरी, शंभूराजे मोरे, भारत पाटील, यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार राजन पाटील यांनी पत्र पाठवून आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत अशी भूमिका मांडली. करमाळा माढा आणि मोहोळ तालुक्यातील बहुतांश नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर उत्तम प्रकाश खंदारे नारायण पाटील संजय कोकाटे भारत शिंदे यांनी अधिक माहिती दिली. सोलापूरच्या शेतकऱ्यांचं एक थेंबही पाणी इंदापूरला जाऊ द्यायचं नाही आजच्या बैठकीला जरी अनेक नेते उपस्थित नसले तरी त्यांची पुन्हा एकदा भेट घेऊन त्यांना सोबत घेणार, प्रसंगी मराठा आरक्षणाप्रमाणे उजनी पाणीप्रश्नी संघर्ष उभा करू असा इशारा देतानाच महा विकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांना एकत्रित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडायचा असे नियोजन झाले. वेळ पडल्यास न्यायालय जाऊ, पाणी लवादाकडे जाऊ असे नारायण पाटील म्हणाले.



















