सोलापूर ! महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी झगडतोय, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले, केंद्र सरकारची न्यायालयाने याचिका फेटाळली, राज्य सरकार आरक्षणासाठी प्रयत्न करतंय, केंद्राचा निर्णय होत नाही.
अशातच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा आक्रोश मोर्चाचे नियोजन सोलापूरातून केले, सोलापूरात भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोडले तर इतर पक्षातील मराठा समाजाचे नेते सोबत नव्हते परंतु समाजातील किरण पवार, राम जाधव हे दोन समन्वयक सदैव सोबत राहिले, सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तालुक्यात नियोजन करण्यात या दोन युवकांनी नरेंद्र पाटलांची साथ सोडली नाही, ते आक्रोश मोर्चाचे सोलापुरातील मुख्य समन्वयक होते.
मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, काहीही झाले तरीही मोर्चा काढणारच या भूमिकेवर नरेंद्र पाटील ठाम राहिले,
पोलिसांनी संपूर्ण सोलापूर शहरासह ग्रामीण भागात बंदोबस्त लावला, संचारबंदी लावली, नेत्यांना अडवले, समाजातील युवक, महिलांना मोर्चाला येऊ दिले नाही, दुसऱ्या दिवशी अधिवेशन असल्याने हे सर्व चित्र अख्ख्या महाराष्ट्र टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून पहात होता, तरीही 5 हजाराच्यावर मावळे मोर्चात सहभागी झाले, आणि मराठ्यांचा आक्रोश सरकार पर्यंत पोहोचलाच.
निवेदन देण्यासाठी जेव्हा नरेंद्र पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मोर्चा यशस्वी झाल्याचा आनंद झळकत होता, त्यांनी आरामपणे बसून पोलिसांनी दिलेल्या पाण्याच्या दोन बाटल्या पिल्या, नंतर किरण पवार, राम जाधव या दोन युवकांच्या हातात निवेदन दिले, तुम्ही मोर्चाचे समन्वयक आहात, तुम्हीच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचे, आम्ही कार्यकर्ते आहोत,मागे राहणार असे सांगितले. हे सांगतानाच त्यांनी या दोघांना, संपूर्ण महाराष्ट्र आज आपणाला बघत होता, तुम्ही सेलेब्रिटी झालात रे, मला विसरू नका, सोलापूरला आल्यावर किमान चहा पाणी विचारा बाबांनो या शब्दांमधून मागील अनेक दिवस समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नाचे चीज झाल्याच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलं.





















