Solapur | पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी नेण्याला मंजुरी आणली होती मात्र याला सोलापूरकरांनी प्रचंड असा विरोध केला सर्व पक्षासह सोलापुरातील नागरिकांचा रोष पाहता पाणी देण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली. तेव्हा पालकमंत्री दत्तामामा भरणे हे नाराज दिसून आले त्यांनी पालकमंत्री पद सोडण्याची भाषा केली होती.
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली मात्र सोलापूर शहर जिल्ह्याला लस मिळवण्यात ते मागे पडल्याचे दिसून येत आहे. लसीकरणावरून सध्या पालकमंत्री भरणे मामा सर्वांचेच टार्गेट झाले आहेत, मात्र भरणे मामांनी लस कमी येण्यामागील कारण माध्यमांना सांगितले आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी तिथे लस कमी दिल्या जात आहेत, याच पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या अँटी चेंबरमध्ये भाजपचे सदस्य आनंद तानवडे, मदन दराडे, शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य एडवोकेट सचिन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य भारत आबा शिंदे, पंढरपूरचे ज्येष्ठ सदस्य वसंतनाना देशमुख ही नेते मंडळी बसली होती.
यावेळी लसीकरणाचा विषय निघाला तेव्हा भारत आबा शिंदे यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या बैठकीचा किस्सा सांगितला या बैठकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात किती लस मिळाली, पुणे आणि सातारा तालुका जिल्ह्यात 50 टक्के लसीकरण झाले आहे मात्र सोलापुरात ते वीस ते पंचवीस टक्क्यांच्या पुढे गेलेले नाही मग तुमचा खासदार म्हणून काय उपयोग असा प्रश्न भारत आबांनी खासदारांना केल्याचे सांगितले. याच वेळी सर्व सदस्यांमधून पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याविरोधात सुर आला, लस सोलापूरला आणण्यामध्ये भरणे मामा सपशेल अपयशी झाले आहेत. असे बोलत असतानाच एका सदस्यांनी तर हा तर मामा “लबाडच” आहे असे म्हणून आपली नाराजी व्यक्त केली. याचवेळी आमदार संजयमामा यांचा विषय निघाला, लगेच एकाने हा मामा कसा होता? असा प्रश्न केला. या तर मामाचे काय सांगू नका त्यांनी तर अख्खी झेडपी लुबाडून करमाळ्याला नेली, असे म्हणताच सभापती डोंगरे यांनी आमच्या मामाला काय बोलायचं नाही दुसऱ्या मामाला काय पण म्हणा आम्हाला काय देणेघेणे नाही असे म्हणून आपले मित्र प्रेम व्यक्त केले.


















