सोलापूर : येथील लष्कर भागातील हिंदू मोची युवा जागर, सामाजिक संघटनेचे रवि गोणे व प्रकाश आसादे यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सोलापूरातील ताडी दुकाने बंद होण्यासाठी मोची समाजातील युवकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाला आमदार देशमुख यांची मोठी साथ मिळाली होती. तेच ताडी दुकाने आता पुन्हा ‘पाम वाईन’ या नावाने डोके वर काढत आहे. या विरोधातही मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी असल्याचे मोची समाजाचे युवा नेतृत्व रवि गोणे आणि प्रकाश आसादे यांनी सांगितले.
कै. करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधीला गर्दी जमल्याने मोची समाजातील २५० निष्पाप युवकांवर गुन्हे दाखल झाले. या विषयावर बोलताना आमदार देशमुख म्हणाले, येत्या १२ तारखेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यात आपल्यासमवेत हा विषय त्यांच्यासमोर मांडीन. तसेच हा विषय विधानसभेत मांडून सर्वांवरील गुन्हे काढून टाकण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कै. करण म्हेत्रेच्या अंत्यविधीला आलेले लोक हे स्वयंस्फूर्तीने आले होते. त्यांना कोणी बोलावले नव्हते. लोकांच्या भावना अनावर झाल्याने ते थांबू शकले नाहीत. त्यामुळे मी यावर तोडगा काढण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचा शब्दही यावेळी देशमुख यांनी दिला.
याप्रसंगी सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक सुनिल कामाठी, राजकूमार पाटील, रवि कैय्यावाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.


















