सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला, पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय आवश्यक आहे, जनतेने पोलीसांना घाबरू नये, समन्वय ठेवावा, असे सांगतानाच सायबर क्राईम बाबत बोलताना त्यांनी नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये, चूका या आपण स्वतः करतो त्या होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, ऑनलाइन फसवणूक गुन्ह्यांना आवर घालता येईल. शहरातील वाहतूकिला शिस्त लावणार मात्र नागरिकांचे प्रबोधन करून. त्यासाठी शाळांचा उपयोग करून घेणार अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली घाटे, उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्त बापू बांगर हे उपस्थित होते.
दरम्यान कोण आहेत हरीश बैजल व काय आहे त्यांची प्रशासकीय कारकीर्द….
मूळचे जालन्याचे असलेले बैजल यांनी 1993 मध्ये पोलिस दलात जॉईन केले. मुर्तुजापूर जि. अकोला या ठिकाणी त्यांची पहिली पोस्टिंग पोलिस उपअधीक्षक म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी पांढरकवडा जि. यवतमाळ , रायगड, औरंगाबाद या ठिकाणी काम केले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेतही त्यांना एक वर्ष कोसोव्वा येथे काम करण्याची संधी मिळाली. तिथून आल्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली आणि मुंबईतील वाहतूक शाखेचे ते पोलिस उपायुक्त झाले. त्या ठिकाणी काम करताना त्यांनी प्रथमच मुंबईत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. “नो हॉर्न डे’ हा उपक्रम राबविला. 2008 नंतर त्यांना पदोन्नती मिळाली आणि नाशिकमध्ये लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे ते पोलिस अधीक्षक झाले. नाशिक येथील पोलिस अकॅडमीतही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी अन्न व औषध विभागाचे (एफडीए) सहआयुक्त म्हणून काम केले.
सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीतील इफेड्रिन प्रकरणात त्यांनी मोठी कारवाई केली होती. त्यांनी राज्य मानवाधिकार आयोगातही काम केले. त्यानंतर त्यांची बदली गोंदियाचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली. तेथून पदोन्नतीवर त्यांची बदली झाली अन् मुंबईत सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षकपदी काम करण्याची संधी मिळाली. आता ते सोलापूर पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत.
‘सायकलवरून पंढरपूर वारी’ ही अभिनव संकल्पना राबविणारे, ऑफिसला सायकलने जाणारे वरिष्ठ आयपीएस हरीश बैजल यांची ओळख आहे.


















