सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्ह्यातील शाळा स्वच्छ व सुंदर हा उपक्रम हा राबवल्याप्रकरणी एकीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला मात्र दुसरीकडे ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक सुभाष माने यांनी शिक्षण विभागावर हल्लाबोल केला.
जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत त्यामुळे बऱ्याच शाळा उद्ध्वस्त झाल्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने शाळा दुरुस्तीसाठी पाठवलेले पैसे अकरा महिने झाले, त्याचा विनियोग झाला नाही, नादुरुस्त शाळा कधी बांधणार? शिक्षण विभाग काय करते असा सवाल केला.
सुभाष माने यांच्या मागणीवर आनंद तानवडे, भारत आबा शिंदे, शैला गोडसे, अतुल खरात यांनी आपल्या भूमिका मांडल्या. अतुल खरात यांनी डीपीसी समोरील असलेली इमारत पाडली जाते मात्र शाळेच्या धोकादायक खोल्या पाडून बांधल्या जात नाहीत, शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले का? असा सवाल केला. आनंद तानवडे यांनी जिल्हा परिषदेच्या अनेक बिल्डिंग जुन्या झाल्या आहेत त्या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी केली. शैला गोडसे यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नादुरुस्त शाळा खोल्या बांधून घ्याव्यात असा निर्णय करावा अशी मागणी केली.
















