सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावात वादळी वाऱ्यामुळे वीजेची तार तुटून अंगावर पडल्याने करंट लागून 3 शेळ्या जागीच ठार झाल्या.
शुक्रवारी (ता.19 नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मागील दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, वादळी वाऱ्यांसह हा पाऊस पडत आहे, या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान होत आहे,
दरम्यान डोणगावात शुक्रवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून वारे सुटले त्यामुळे वीजेची तार तुटून रस्त्यावर पडली यावेळी रस्त्याने जाणाऱ्या तीन शेळ्यांना तारेतील वीजेचा जोरदार धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. महानंदा लिंबाजी वाघमारे यांच्या या शेळ्या आहेत.
महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेळ्या राखून आपली गुजराण करणाऱ्या महानंदा वाघमारे यांना शासकीय मदत देण्याची मागणी गावातील सामाजिक कार्यकर्त्या व बचत गटाच्या प्रमुख सारिका वाघमारे यांनी केली आहे.

















