सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचा वादग्रस्त निलंबित मुख्याध्यापक पदस्थापनेसाठी मुंबईत मंत्रालयासमोर उपोषण करत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर कन्नड शाळेतील महिला सहकाऱ्याच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीत त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे पती पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत जवळच्या शाळेत बदली मागितली. पण तत्कालीन शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे अन्याय झाल्याच्या निषेधार्थ कट्टीमनी यांनी डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुनावणी घेऊन त्यांना न्याय देण्याचे आदेश दिले. पण शिक्षण विभागाने आदेश काढताना मूळ गाव सोडून नियुक्ती द्यावी असे नमूद केले. यामुळे गटशिक्षणाधिकारी भांजे यांनी शाब्दिक घोळ घालून त्यांना नियुक्ती देण्याचे टाळले. याच प्रकरणातून जिल्हा परिषदेमध्ये सुहास चेळेकर लाच प्रकरण घडले, लाच घेतली नसतानाही मागितल्यावरून कारवाई झाली. याला प्रमुख जबाबदार हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे हे असल्याचे बोलले जाते. तत्कालीन शिक्षणाधिकारी राठोड यांनी आपल्या मर्जीतल्या विस्तार अधिकाऱ्यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार दिला. तेव्हापासून प्रभारींच्या जोरावर राठोड यांनी बराच मलिदा हाणला. मागील काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अक्कलकोट तालुक्याचा दौरा केला तेव्हा भांजे यांनी न सांगता दांडी मारली होती, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही हे विशेष होते. हा माणूस जातीद्वेषी असल्याचा आरोप अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांकडून केला जातोय.
उपोषण कर्ते मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी भांजे यांच्यावर केलेले हे आरोप आहेत.
गटशिक्षणाधिकारी भांजे यांनी फौजदारी झालेल्या शिक्षकाला हजर करून घेतले, बडतर्फ शिक्षकाचा पगार काढला, बेकायदेशीररित्या बणजगोळच्या शिक्षकाला जेऊरला नियुक्ती दाखविली. आपल्यावर मात्र जाणीवपूर्वक नियम दाखवित अन्याय केला. बांधकाम विभागाने शाळेचे अंतर मोजून दिलेले असताना स्वत:च्या मर्जीने आदेशात कमी अंतर दाखविले.

















