सोलापूर : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी न्याय हक्कासाठी संपावर आहेत. काही एसटी कर्मचार्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केले आहेत, मात्र राज्य सरकार अद्याप याबाबत बेजबाबदारपणे वागत आहे, याची दखल घेत जोपर्यंत एसटी कर्मचार्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लीमीनचा (एमआयएम) पक्ष एसटी कर्मचार्यांसोबत असेल असे एमआयएमचे शहर-जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी यांनी सांगितले.
सोलापूर येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपाला भेट देऊन एसटी कर्मचार्यांची विचारपूस करून संपाला एमआयएमचा पूर्ण पाठिंबा असले असे सांगितले. एमआयएम पक्ष हा कर्मचारी, मजूर, गरीबांचा आहे, त्यामुळे कर्मचार्यांवर होणार्या अत्याचाराविरोधात नेहमी लढणारा पक्ष आहे, एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी आणि खा. इम्तियाज जलील यांच्यावर दबाव टाकून हा विषय संसदमध्ये उठवण्याची मागणी करणार आहे. असेही फारूख शाब्दी यांनी सांगितले.
शासनाचे महामंडळ असले तरी, यामध्ये कार्यरत असणार्या कर्मचार्यांना राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे नियमित लाभ व सुविधा मिळत नाहीत. या महामंडळामध्ये कार्यरत असणार्या कर्मचार्यांना रात्रंदिवस काम करून देखील तुटपुंजे वेतन मिळत आहे. सेवा निवृत्तीनंतरही नाममात्र पेन्शन मिळते हि अतिशय खेदाची व दुर्दैवी बाब आहे. सावकार माणूस सावकार होत आहे, तर गरीब माणसांची भूक भागविणे अवघड होत आहे, कुठलाही कर्मचारी विनाकारण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत नाही, त्यांची मागणी रास्त आहे, आतापर्यंत 67 एसटी कर्मचार्यांना आत्महत्या केले आहेत, तरीही सरकारला जाग येईना, याची मागणी एका क्षणात सरकार पूर्ण करू शकते, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, अशा सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असेही शाब्दी म्हणाले.
यावेळी एमआयएमचे नेते नगरसेवक अजहर हुंडेकरी, नगरसेवक गाजी जहागीरदार, रियाज सय्यद, अझहर जहागीरदार, सलीम पामा, सत्तार शेख, इक्बाल पठाण, कम्मो शेख, यांच्यासह एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















