सोलापूर : ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्हय़ात उळेगावाच्या शिवारात आगमन झाले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कासेगावच्या सरपंच सुरेखा जनार्दन काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, नायब तहसिलदार शुभांगी जाधव, नायब तहसिलदार गायकवाड, तालुका कृषी अधिकारी माळी, सर्कल धनुरे, हेडगिरे यांच्यासह इतर मान्यवर व अधिकाऱ्यानी पालखीचे स्वागत केले.
कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या पालखी सोहळय़ात शिस्तीचे भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले. २६ दिवसांचा पायी प्रवास करीत सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेल्या या पालखी सोहळय़ात पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ६५० भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
श्री गजानन महाराजांच्या नामाचा गजर, वीणा, टाळ-चिपळय़ांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच तल्लीन होऊन ‘श्रीं’च्या दर्शनासाठी पुढे येत होते. अग्रभागी मानाचे अश्व आहे. यानंतर श्री गजानन महाराजांची पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे मुक्कामी रवाना झाली.





















