सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल असलेल्या हरकतींवर आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.
कुंभारी, गोदुताई विडी घरकूल आणि नियोजित रे नगर यांच्यात संयुक्त नगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू होत्या. प्रस्तावित नगरपरिषदेला ग्रामस्थांनी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, तत्कालीन विरोधी पक्षनेते व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कडाडून विरोध केला होता.
यानंतर प्रशासनाने हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार कुंभारी ग्रामपंचायतीसह इतर नऊ अशा एकूण दहा हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. मात्र या दाखल हरकतींवर प्रशासनाने सुनावणी न घेताच त्या हरकती राज्याच्या नगरविकास विभागाकडे वर्ग केल्या होत्या. याला कुंभारीच्या सरपंच श्रुती निकंबे यांनी हरकत घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हरकतींवर सुनावणी न घेताच नगरविकास विभागाकडे पाठवून दिल्याचा आक्षेप त्यांनी उच्च न्यायालयासमोर नोंदविला होता. याची दखल घेत उच्च न्यायालयाने दाखल हरकतींवर सुनावणी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी आज (गुरुवारी) सुनावणी ठेवली होती. परंतु सरपंच निकंबे यांच्यावतीने वकिलांनी कागदपत्रे व लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यानुसार आता पुढील सुनावणी 27 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
याप्रकरणात कुंभारी ग्रामस्थांतर्फे अॅड. उमेश मराठे, अॅड. राजशेखर कोरे हे काम पाहत आहेत. आजच्या सुनावणीवेळी ज्येष्ठ नेते शिरीष पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद अंदोडगी, विजयकुमार शाबासे, बुडन मुजावर उपस्थित होते.



















