सोलापूर : शेतजमिनीचे वाटपपत्राची नोंद लावून ७/१२ उतारा देणेसाठी श्रीछाया एसकुमार बिराजदार वय ३४ वर्षे पद तलाठी सजा कौठाळी ता. उत्तर सोलापूर वर्ग- ३ राहणार शिवालय, ६५६ के स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर यांना लाच लूचपत अधि. कलम ७ अन्वये २ वर्षे सक्त मजुरी व १००० रु. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास तसेच कलम १३ अन्वये ३ वर्षे सक्त मजुरी व २००० रु. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
यातील तक्रारदार यांना त्यांचे शेतजमिनीचे वाटपपत्राची नोंद लावून ७/१२ उतारा देणेसाठी आलोसे तलाठी श्रीछाया एसकुमार बिराजदार हिने ५०० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावरून तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे संपर्क साधला असता अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूरकडून लाचेची सापळा लावण्यात आला होता. त्यामध्ये तलाठी श्रीछाया एसकुमार बिराजदार यांना लाच स्विकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले होते..
त्यावरून श्रीछाया एसकुमार बिराजदार यांचेविरुध्द सदर बझार पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम क. ७, १३(१) (ड) सह १३ ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास शंकर साळुंखे तत्कालीन पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर यांनी करून श्रीछाया बिराजदार यांच्या विरुध्द विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या केसची न्यायमुर्ती व्ही. एच. पाटवदकर जिल्हा न्यायाधीश २ सह सत्र न्यायाधिश सोलापूर यांच्या कोर्टात होवून आरोपी श्रीछाया एसकुमार बिराजदार यांना गुन्हयात दोषी ठरवून ३ वर्षे सक्त मजुरी व २००० रु. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकार तर्फे सदर खटल्यात अँड. प्रकाश जन्नू व दत्ता पवार तर आरोपीतर्फे अॅड. राहुल खंडाळ यांनी काम पाहिले. अॅन्टी करप्शन तर्फे कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहा. पोलीस फौजदार सायबण्णा कोळी, पोह चंगरपल्लू, पोह बाणेवाले व पोना घुगे यांनी काम पाहिले आहे.
















