सोलापूर : चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सोलापूरचा पालकमंत्री कोण याचीही प्रचंड उत्सुकता होती शेवटी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोलापूरचे पालकमंत्री पद आले.
विखे पाटलांनी सोलापुरात प्रवेश करताच शहरात जितके महापुरुषांचे पुतळे आहेत त्या सर्वांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांचेही दर्शन घेतले. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक हेरिटेज लॉन मध्ये घेण्यात आली. एकूणच पालकमंत्र्यासोबत आमदार विजयकुमार देशमुख हे कुठेच दिसले नाहीत मात्र जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते हजर होते.
यावेळी राजकीय योगायोग दिसून आला, पहिल्या रांगेमध्ये आमदार बसले होते त्या रांगेत तीन शिंदे आमदार एकाच बाजूला दिसून आले. विशेष म्हणजे आमदार सुभाष देशमुख, त्यांच्यानंतर आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या बाजूला आमदार विजयकुमार देशमुख अशी बैठक व्यवस्था दिसून आली. सोलापूर शहरांमध्ये असलेल्या विधानसभेच्या तीन मतदारसंघानुसार आमदार बसल्याचे दिसत होते. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही देशमुख आमदार तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी शहराच्या मूलभूत प्रश्नांवर चांगलाच आवाज उठवला.
विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मतदारसंघातील क्रीडा संकुलाचा विषय, सोलापूर विमानतळाचा विषय तसेच मुळेगाव क्रॉस रोड या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल बांधावा असे महत्त्वाचे विषय मांडले. आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी विमानतळ, मल्लिकार्जुन नगर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल, शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक नळ तोडणीच्या कारवाई विरोधात आवाज उठवत या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली तसेच विजेचा शॉक लागून तरुणांचे मृत्यू झाले आहेत या मोठ्या वीज प्रवाहाच्या लाईन लवकरात लवकर अंडरग्राउंड करा यासह रेल्वेच्या जागेत अनेक झोपडपट्टी आहेत वर्षानुवर्ष लोक तिथे राहत आहेत त्यावर संयुक्त बैठक लावून तोडगा काढावा अशा मागण्या केल्या. आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील टेंडरच्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली, हद्दवाढ भागामध्ये जिल्हा परिषदेच्या असलेल्या शाळा महापालिकेकडे हस्तांतर करा अशी मागणी त्यांच्याकडून पुन्हा आली तसेच सार्वजनिक नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाईलाही त्यांनी विरोध केला.


















