जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांचे घर फोडणारा चोरटा पोलिसांच्या तावडीत ; कुठून आला होता सोलापुरात घरफोडी करायला
सोलापूर :शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरी घडलेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आलंय. गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकाने संशयित इसमाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन त्यास ताब्यात घेतले असता तो आंतरराज्य सराईत गुन्हेगार आहे. अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर (वय-३८ वर्षे, उत्तरप्रदेश) असं त्याचं नाव आहे. त्याने जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोरपडी केल्याची कबुली दिलीय.
दिवसाढवळ्या घरफोडी करण्यात त्याचा विशेष हातखंडा होता, त्याच्या ताब्यातून 11 तोळे सोने व त्याहून अधिक वजनाची चांदी जप्त करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धेश्वर पेठ सेंटर पार्क येथे वास्तव्यास असलेले कादर राजूमियॉ शेख, वय ५० वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. प्लॅट नं. ६०२, सेंटर पार्क अपार्टमेंट, सिध्देश्वर पेठ, सोलापूर हे शिक्षणाधिकारी पदावर जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय परगावी गेल्याने कादर शेख हे नोकरीच्या ठिकाणी जाताना घराला कुलूप लावून गेले होते.
सायंकाळी ते कामावरून परत आले असता, त्यांच्या घरात चोरी झाल्याचे, तसेच त्यांच्या बेडरूम मधील कपाटातील सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दहा तोळे वजनाचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले. . ही घटना ११ मार्च रोजी रात्री ०८:३० वा.पूर्वी घडली. त्यांच्या तक्रारीवरून जेलरोड पोलिसांकडे भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५ (ए), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याच्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर व त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळ, आसपासच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण करीत आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.
त्यानुसार सपोनि खेडकर व तपास पथकास एका संशयित व्यक्तीच्या हालचालीवर संशय निर्माण झाल्याने त्या संदर्भात माहिती संकलित करीत असतानाच तो आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची देखील माहिती मिळाली. २० मार्च रोजी तो घरफोडी करण्याच्या उद्देशाने सोलापुरात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यास तपास पथकाने हॉटेल अॅम्बेसिडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर युनिटी अपार्टमेंटजवळ सापळा लावून पकडले.
त्याच्या ताब्यातून घरफोडी करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यही जप्त करण्यात आले. त्याच्या झाडाझडतीत त्याचं नांव अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर (वय-३८ वर्षे, रा. ग्रा.पो. बोदरी, ता. केराकत जि. जौनपूर) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याने जरूर पोलीस ठाण्याकडील घरपोडी तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे घरफोडी चा गुन्हा केल्याची कबुली दिली.
सपोनि खेडकर व त्यांचे तपास पथकाने त्याच्या ताब्यातून ११० ग्रॅम (११ तोळे) वजनाचे सोन्याचे व एकूण ११३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा ऐवज हस्तगत केला. त्या आरोपीविरूध्द, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, या राज्यात दिवसा घरफोडीचे ३५ गुन्हे दाखल आहेत, असं सांगण्यात आलंय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स. पो. नि. शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, इब्राहिम शेख, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, आकाश घोलकर तसेच सायबर पो. स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.