आ. विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून केवळ 3 लाख 71 हजारात मिळणार वन बीएचके फ्लॅट
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत सोलापुरातील असंघटीत कामगारांकरिता राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणे, ता-उत्तर सोलापूर यांच्या माध्यमातून केवळ तीन लाख 71 हजारात वन बीएचके फ्लॅट मिळणार असून पहिल्या टप्प्यातील बाराशे घरकुलांची लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर किरण देशमुख यांनी दिली.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्याने ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत या कामगार वर्गासाठी ५००० घरकुल उभारणीचा संकल्प करण्यात आला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश रेवप्पा बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत सोलापुरातील असंघटीत कामगारांकरिता राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणे, ता-उत्तर सोलापूर, जिल्हा-सोलापूर या संस्थेची स्थापना केली.
या संस्थेच्या माध्यमातून सोलापुरातील असंघटीत क्षेत्रात काम करणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) कामगार जसे कि, रिक्षा चालक, शिलाई कामगार, यंत्रमाग कामगार, अडत कामगार, माथाडी कामगार, हॉटेल कामगार, भाजीपाला विक्रेते, रुग्णालयातील कर्मचारी, बांधकाम क्षेत्रातील कामगार, इतर व्यावसायिक दुकानात काम करणारे व अन्य गरजू कामगार वर्गासाठी ५००० घरांच्या बांधणीचे उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी समाजातील वंचित घटकांना अल्प किमतीत घरे उपलब्ध व्हावीत म्हणून ग्रीन झोन असलेल्या जमिनी प्रधानमंत्री आवास योजनेकरिता वापरण्याची परवानगी दिली. त्याअनुषंगाने सदर संस्थेच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकसित होत असलेल्या दहिटणे परिसरामध्ये जागा घेण्यात आली. या परिसरामध्ये अल्प किंमतीत घरकुल प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाल्यामुळे संस्थेस घरकुलाची किंमत कमीतकमी राखण्यास बहुमोल मदत झाली.
या गृह्प्रकल्पामधील पहिल्या टप्प्यातील १२०० घरांच्या प्रकल्पाची एकूण किंमत रु.७४.७६ कोटी इतकी असून, एका घरकुलाची किंमत ही रु.६.२१ लाख अशी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना रु. २.५ लाख सबसिडी मिळाल्यानंतर सर्वसाधारण घटकातील जनतेला हे घरकुल रु.३.७१ लाख किमतीमध्ये उपलब्ध असेल, ते त्यांच्या बचतीतून अथवा गृहकर्जाच्या माध्यमातून सदर घरकुल मिळवू शकणार आहेत. तसेच, नोंदणीकृत व सक्रीय बांधकाम कामगार, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळाकडून अतिरिक्त प्रत्येकी रु.२.०० लाखाच्या सबसिडीस पात्र ठरल्यास हे घरकुल त्या सभासदांना फक्त रु.१.७१ लाख मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, देशमुख यांनी विशेष प्रयत्न करून इतर कामगारांना घरकुलासाठी सोलापूर जनता बँकेकडून अत्यल्प व्याजदरामध्ये गृहकर्ज उपलब्ध करून सुलभ मासिक हप्त्यात परतफेडीची सुविधाही करून दिलेली आहे.
नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून विजयकुमार देशमुख यांनी सदर गृहप्रकल्पामध्ये रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, इ. मुलभूत सोयी-सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला, तर या प्रकल्पासाठी खास बाब म्हणून स्वतंत्र सब-स्टेशन व अंतर्गत दिवाबत्ती करिता शासनाच्या NSC योजनेमधून निधी मंजूर करून दिला.
असा जनतेच्या हिताचा, सर्व सोयींनी परिपूर्ण असा गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील बाराशे घरे देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास येत असल्याने, येत्या काही दिवसातच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सदर प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरकुल हस्तांतरण करण्याचा मानस असल्याचे डॉक्टर किरण देशमुख आणि चेअरमन सुरेश बिराजदार यांनी सांगितले.