आम्ही भाजपचे काम करणार नाही ; माढ्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारीचे पडसाद
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही असा निर्धार करत माढा लोकसभा मधील पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिले आहेत.
संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली आम्ही ज्या राष्ट्रवादीचे आमदार बबन दादा शिंदे, संजय शिंदे यांच्या विरोधात आजवर राजकारण केलं त्यांच्या बाजूनं राजकारण करा अशी भूमिका पक्ष नेतृत्वाची असेल तर ती आम्ही मान्य करणार नाही. माझा राजकीय बळी मी कोणासाठी का देऊ? असा सवाल त्यांनी केला
भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे भ्रष्ट प्रवृत्तीला खत पाणी घालणारे आहे. माढा, करमाळाचे आमदार शिंदे आणि त्यांच्या पिलावळीच्या भ्रष्टाचाराला केवळ अभय दिला असं नव्हे तर खत पाणीही घातलं जात आहे. त्यांना लाखो रुपयांची दलाली घेऊन साखर कारखाने विकत दिले. भारतीय जनता पार्टीने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या विरोधात काम केलं. आता आम्हीही या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात काम करणार आहोत.
आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जातींमध्ये भांडण लावली जात आहेत. महिला विधेयकामध्येही महिलांची फसवणूकच झाली आहे अशा पक्षाचा आम्ही का म्हणून प्रचार करायचा? असा सवालही त्यांनी केला.
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची आगामी काळात युती राहणार आहे. आम्ही मात्र भाजपच्या उमेदवारा विरोधात काम करण्याचा निर्धार केला असल्याने संभ्रम नको म्हणून पक्षाचे पद आणि पक्ष त्याग करण्याचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेवेळी संजय कोकाटे, विनोद पाटील, रामचंद्र टकले, यशवंत भोसले, विजय पवार, परीक्षित पाटील आदी उपस्थित होते.