जिल्हा परिषद पतसंस्थेच्या निवडणूक अर्ज छानणीत दोन अर्ज बाद ; नऊ अर्ज ठेवले निवडणूक अधिकाऱ्यांनी वेटिंगवर
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एकच्या 17 संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जागांसाठी 79 उमेदवारांनी 92 अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी मंगळवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या समोर करण्यात आली.
या अर्ज छाननी मध्ये ओबीसी जागेसाठी निवडणूक असताना त्याऐवजी एनटी आणि एसबीसी हे प्रमाणपत्र जोडल्याने दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव गोविंद नेमाने व दीनानाथ सुभाष जमादार असे दोन उमेदवारांची नावे आहेत.
तर संस्थेकडून उपलब्ध माहितीनुसार 9 उमेदवारांकडे पतसंस्थेची थकबाकी असल्याने त्यांना मंगळवारी दुपारपर्यंत त्यांच्या अर्ज वेटिंगवर ठेवण्यात आला आहे. दुपारी तीननंतर थकीत नसल्याचा दाखला पतसंस्थेने दिला तर त्यांचे अर्ज मंजूर होतील अशी माहिती मिळाली. यामध्ये जिल्हा परिषदेतील एका नावाजलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे कळते.
संपूर्ण जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. जिल्हा परिषदेमध्ये अनेक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून पतसंस्थेसाठी फिल्डींग लावण्यात येते. या पतसंस्थेवर मागील अनेक वर्षांपासून निवृत्त अधिकारी पंडित भोसले व प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज गटाचे वर्चस्व राहिले आहे. विरोधात असणारे राजेश देशपांडे, अविनाश गोडसे, गिरीश जाधव, अरुण क्षीरसागर हे सर्व नेते यांना परिवर्तन करण्याच्या तयारीत आहेत.