दक्षिण मध्ये शिवसेनेच्या पाटलाची चर्चा ; विधानसभेची मोर्चेबांधणी, भावी आमदाराच्या पोस्टरने वेधले लक्ष
सोलापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शिवसेना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या तिघांनी मिळून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे हीच महाविकास आघाडी पुढेही एकत्रितच विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मिळालेला प्रतिसाद पाहता इच्छुकांची मोठी संख्या वाढली आहे सर्वाधिक लक्ष लागलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अनेक कार्यकर्त्यांच्या आशा वाढल्या आहेत. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुक्याचे नेते अमर पाटील यांनीही आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अमर पाटील हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. त्यांचे वडील रतिकांत पाटील यांनी यापूर्वी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे दक्षिण मतदारसंघात पाटलांचे वलय पाहायला मिळते. लिंगायत समाजातील भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील गाव भेट दौरा करून अमर पाटील यांनी आपली मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमर पाटील यांनी अनेक सामाजिक उपक्रम घेतले आहेत त्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
शहरी भागात ठीकठिकाणी अमर पाटील यांचे भावी आमदार म्हणून पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत दक्षिण सोलापूर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सुटण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्नशील आहेत. उमेदवारी वाटपावेळी काहीही होऊ शकते त्यामुळे सर्वच नेते जोरदार तयारी करताना दिसत आहेत.