लोकसभा असताना दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना होम टाऊन कसे? सोलापुरात प्रश्न उपस्थित, ‘जगताप’वर राहणार प्रशासनाची करडी नजर
सोलापूर : लोकसभा निवडणूक होत असल्याने त्या त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने इतर जिल्ह्यांमध्ये बदल्या केल्या आहेत. सोलापूरतील महसूल विभागातील बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या तीन वर्षे झाल्याने बदल्या करण्यात आल्या.
एकीकडे निवडणूक आयोग अतिशय सक्त धोरण वापरत असताना दुसरीकडे मात्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभागाला आलेले दोन शिक्षणाधिकारी हे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुका असताना होमटाऊन कसे मिळाले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
तब्बल सोळा महिन्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाला पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी मिळाला प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख हे वैरागचे आहेत. त्यांनी यापूर्वी सोलापूर महापालिकेमध्ये दोन वर्ष प्रशासनाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे सोलापूर शहरात त्यांची चांगलीच ओळख आहे. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे बार्शी तालुक्याचे रहिवासी आहेत ते सुद्धा जिल्ह्यातील स्थानिक आहेत.
निवडणुका म्हटले की शिक्षकांचा थेट संबंध असतो शिक्षकांवरच निवडणुकांचे नियोजन प्रशासन करते असे असताना शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी स्थानिक कसे काय दिले? असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
यामधील माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची अतिशय वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे. यापूर्वी ते धाराशिव जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी असताना त्यांना एका गंभीर प्रकरणांमध्ये निलंबित व्हावे लागले होते. त्यांचे बरेच किस्से धाराशिव तालुक्यात गाजलेले आहेत. असा अधिकारी माध्यमिक शिक्षण विभागाला मिळाला आहे. त्यामुळे झेडपीच्या डोक्याला ‘ताप’ नको म्हणून जिल्हा परिषदेचे प्रशासन निश्चितच जगताप यांच्याकडे लक्ष ठेवून राहणार आहे.