सोलापूरच्या कासेगावची लेक राज्यात संस्कृत मध्ये नंबर ‘एक ‘ ; हिना तांबोळी हिचे यश
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावची हिना खाजाभाई तांबोळी हिने एस. एस. सी. (दहावी) परीक्षेत संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून संस्कृत विषयात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जन्म, वडील चालक आणि मातृभाषा हिंदी असून तिनं संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले, याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोलापूर शहरातील नामांकित सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटी संचलित सिध्देश्वर कन्या प्रशालेतील विद्यार्थीनी कु. हिना तांबोळी अतिशय अभ्यासू व हुशार विद्यार्थीनी म्हणून तिच्याकडं पाहिलं जात होतं. तिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९१ टक्के गुण प्राप्त केले आहेत.
ग्रामीण भागातील हिनाने विविध प्रकारच्या स्पर्धामध्ये सहभाग नोंदवत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी, शिक्षण समितीचे भिमाशंकर पटणे,जी. एन. कुमठेकर, डॉ. राजशेखर येळीकर, गुरुराज माळगे, मल्लिकार्जुन कळके, नाडगौडा पाटील, समन्वयक संतोष पाटील, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगिता गोटे, पर्यवेक्षक सुनिता वाले, संजीव समन, संस्कृत शिक्षिका पटणे तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी हिनाच्या यशाबद्दल अभिनंदन केलं, तसेच साहित्यिक भगवान चौगुले यांनी हिनाचे विशेष अभिनंदन केले.